Ebola Outbreak : इबोलाचा काँगो आणि युगांडात उद्रेक; जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

इबोलाचे वाढत असलेले रुग्ण हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. मात्र, याचा उद्रेक करोना महासाथीसारखा नसल्याने सध्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ebola Outbreak : इबोलाचा काँगो आणि युगांडात उद्रेक; जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

WHO Health Emergency after Ebola Outbreak : आफ्रिकेतील काँगो आणि शेजारील देश युगांडा येथे इबोला विषाणूने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय म्हणून जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) जाहीर केली आहे. 'WHO' चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी रविवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. असे असले तरी, हा उद्रेक करोना महासाथीसारखा नसल्याने सध्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काँगोची राजधानी किंशासा येथेही इटुरी भागातून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता हा रोग इतर भागात पसरण्याचा धोका कमालीचा वाढला आहे.

मृतांचा आकडा 88 वर; दुर्मिळ 'बुंडिबुग्यो' विषाणूचे आव्हान
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या नव्या उद्रेकात आतापर्यंत 300 हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पसरत असलेला इबोलाचा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘बुंडिबुग्यो’ (Bundibugyo) विषाणूमुळे होत आहे. इबोला व्हायरसचे एकूण 6 प्रकार आहेत, ज्यातील इबोला व्हायरस (Ebola Virus), सुदान व्हायरस (Sudan Virus), बुंडिबुग्यो व्हायरस (Bundibugyo Virus) हे 3 प्रकार सर्वाधिक घातक मानले जातात. यापूर्वी 2007-08 मध्ये युगांडामध्ये या प्रकारचा संसर्ग झाला होता, तेव्हा 149 रुग्णांपैकी 37 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2012 मध्ये काँगोतील इसिरो येथे 29 जणांचा बळी गेला होता.

मृत्यूचा दर 50 टक्के राहण्याची भीती; लस व औषधांचा अभाव
काँगोचे आरोग्य मंत्री सॅम्युअल-रोजर कांबा यांनी अत्यंत चिंताजनक माहिती दिली आहे. सध्या पसरत असलेल्या बुंडिबुग्यो प्रकारच्या इबोला विषाणूवर जगात अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. यामुळे या आजाराचा मृत्यूदर थेट 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. 'आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशन'चे प्रमुख जीन कासेया यांनी सांगितले की, काँगोमधील अंतर्गत संघर्ष, दहशतवादी कारवाया आणि नागरिकांचे सतत होणारे स्थलांतर यामुळे संसर्ग रोखणे कठीण होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या साथीची सुरुवात या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच झाली असावी, परंतु सुरुवातीला ती लक्षात न आल्याने हा विषाणू वेगाने पसरला.

हेही वाचा – Maldives Diving Accident: सागरी गुहांचा शोध ठरला जीवघेणा! 164 फूट खोल समुद्रात गेलेले 5 स्कूबा डायव्हर्स परतलेच नाहीत

संशयित रुग्णांमधील प्रमुख लक्षणे
इबोला विषाणूचा संसर्ग शरीरात झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी 2 ते 21 दिवसांचा कालावधी लागू शकतो. संसर्ग झाल्यास खालील लक्षणे अचानक दिसू लागतात – 

– सुरुवातीची लक्षणे: तीव्र ताप येणे, प्रचंड थकवा व अस्वस्थता जाणवणे, स्नायू दुखणे, तीव्र डोकेदुखी आणि घसा खवखवणे.
– दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे: उलट्या, जुलाब, पोटदुखी, अंगावर पुरळ उठणे आणि मूत्रपिंड व यकृताचे कार्य मंदावणे.
– गंभीर लक्षणे: रुग्णाला उशिराने रक्तस्राव सुरू होतो. तसेच हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेवर हल्ला करत असल्याने रुग्णामध्ये प्रचंड चिडचिड, गोंधळ आणि आक्रमक स्वभाव दिसून येतो.
– मलेरिया, टायफाइड आणि मेनिंजायटिस सारख्या आजारांशी साधर्म्य असल्यामुळे इबोलाचे वेळेवर निदान करणे अत्यंत अवघड जाते.

संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना
इबोला हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून तो रुग्णाचे रक्त आणि उलटी याद्वारे इतरांमध्ये पसरतो. या जीवघेण्या आजारावर सध्या औषध नसल्याने केवळ सामाजिक पातळीवरील प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. यामध्ये संशयित रुग्णांना त्वरित पूर्णपणे विलगीकरणात (Isolation) ठेवणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे आणि मृतदेहांचा अंत्यविधी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित अंतरावरून करणे या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांना सहकार्य करून या उद्रेकावर कडक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आवाहन 'WHO' प्रमुखांनी केले आहे.

हेही वाचा – El Nino: इतिहासातील सर्वात तीव्र 'एल निनो'चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number